राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर उत्पादित होत असलेल्या संत्र्याची देशांतर्गत विपणन व्यवस्था मजबूत करण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर संत्रा निर्यातीस चालना देण्याच्या दृष्टीकोनातून महाऑरेंज या शिखर संस्थेची स्थापना दिनांक 10 मार्च, 2008 रोजी करण्यात आलेली असून, सद्यस्थितीत महाऑरेंज च्या एकूण 5 सभासद संस्था आहेत. महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाच्या सहकार्याने महाऑरेंज मार्फत विविध शहरांमध्ये संत्रा महोत्सवांसारख्या कार्यक्रमांचे आयोजन करून आणि त्यामध्ये सहभागी होऊन संत्रा उत्पादकांना चांगले विक्री दर प्राप्त करून देण्याच्या कामकाजास सुरुवात करण्यात आलेली आहे. निर्यातयोग्य गुणवत्तेच्या संत्रा उत्पादनासाठी शेतक-यांमध्ये जागरुकता निर्माण होण्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रमांचे तसेच शेतकरी मेळाव्याचे आयोजन करून शेतक-यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे.